दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयात “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुस्तक प्रदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच ऑनलाईन पुस्तक परीक्षण या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांना वाचक व विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
दुपारी १२ वाजता प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी फिल्म फेअर अवॉर्ड विजेता सिनेमा “लापता लेडीज” प्रदर्शित करण्यात आला. या प्रदर्शनाद्वारे सामाजिक मूल्ये व वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे स्वीकृत विश्वस्त मा. एम. डी. सोनवणे, अध्यक्ष मा. सुनील दातीर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, माजी उपप्राचार्य डॉ. सुनील शिंदे, उपप्राचार्य अशोक दातीर, एस. एस. गायकवाड, चांगदेव डोंगरे, सुपरवायझर प्रा. विवेक वाकचौरे, सहा. ग्रंथपाल डॉ. प्रवीण घुले, ग्रंथालय लिपिक श्री. भालेराव, श्री मालुंजकर, श्रीमती धुमाळ, परिचर श्रीमती भुजबळ व श्रीमती देशमुख तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत झाले.
प्रश्नमंजुषा उपक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, पुस्तकांविषयी जिज्ञासा व प्रेरणा निर्माण झाली.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागाच्या वतीने करण्यात आले होते. वाचन संस्कृती जोपासण्याचा व ग्रंथालयाशी विद्यार्थ्यांचा आत्मीय संबंध दृढ करण्याचा या कार्यक्रमाचा हेतू यशस्वी ठरला.




